भारतीय शास्त्रीय नृत्याबद्दल जिव्हाळा आणि आस्था असणाऱ्या कुणालाही माहिती असणारं मराठी नाव म्हणजे बेबीताई म्हणजेच रोहिणीताई भाटे. पंडिता. रोहिणी भाटे यांचा जन्म १९२४ साली झाला. लखनौ घराण्याचे पंडित.लच्छु महाराज व जयपूर घराण्याचे श्री. मोहनराव कल्याणपूरकर ह्यांच्याकडे त्यांचं नृत्यशिक्षण झालं. त्यांच्या विद्यार्थिनी प्रेमाने त्यांना बेबीताई म्हणून हाक मारत. नृत्यभारतीच्या संचालिका, नृत्य-संगीत-साहित्य रचनाकार, लेखिका, जेष्ठ अभ्यासक अशा कितीतरी पैलूंनी बेबीताई समृद्ध होत्या. गेल्या वर्षी त्यांच्या निधनानंतर शर्वरी जमेनीस, ऋजुता सोमण, शमा भाटे, मनीषा साठे ह्या त्यांच्या जेष्ठ विद्यार्थिनी त्यांचा नृत्यवारसा जबाबदारीने चालवत आहेत. त्यांना श्रद्धांजली म्हणून, 'अर्घ्य' हा कार्यक्रम त्यांची स्नुषा व शिष्या शमाताई भाटे ह्यांच्या नादरूप ह्या संस्थेने सादर केला.
४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात हा कार्यक्रम पहायचा योग आला. कार्यक्रमाची सुरुवात शमाताई व त्यांच्या शिष्यांनी केली. गुरुवंदना कृष्णवंदनेनंतर यमन रागातला तराना सादर झाला. ह्या झपतालातील ताराण्यात ढंगदार 'थाट' व रुबाबदार चालींच्या 'गतानिकास' ह्याचा सुरेख मिलाप बघायला मिळाला. सौम्य पण मोहक रंगसंगतिचा पोशाख नृत्यातील तोल व लहेजा ह्यांच्या सुंदर मिलापाने रंगमंच उजळून निघाला. तराण्यासारख्या फारशी भाषेचा प्रभाव असलेल्या बोलांवर आधारित असलेल्या संगीत प्रकारामध्ये तोडे, तुकडे, तत्कारांचा (Footwork) अप्रतिम गोफ विणला होता. ह्यानंतर रुद्र सारख्या अनवट तालातल्या बंदिश वाद्यसंगीतावर प्रस्तुत केल्या गेल्या. पंडित. रवींद्र चारींच्या सतारीवर अप्रतिम नृत्यरचना पेश केली गेली. कथक सारख्या तालप्रधान नृत्यात तंतुवाद्यावर इतकं सुंदर नृत्य रचलं जाणं व ते पाहायला मिळण हा एक दुर्मिळ अनुभव होता.
बेबीताईंच्या जेष्ठ शिष्या शर्वरी, ऋजुता, प्राजक्ता व मनीषा ह्यांनी गणेशवंदना सादर केली. ह्या वंदनेची खासियत म्हणजे ह्याची साहित्य, संगीत व नृत्यरचना रोहिणीताईनी केली होती. 'सिंदूर वदन, मदनसम सुंदर' ह्या वंदनेत मदनाइतका मोहक गणराय रंगमंचावर इतका नयनरम्य उतरला कि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. गेली २२ ते २५ वर्ष रोहिणीताईचा नृत्यामृती परीसस्पर्श लाभल्यावर त्यांच्या शिष्यांचं बावनखाशी सोनं कलेतून लखलखत होतं. रोहिणीताईच्या भाषेत सांगायचं झाला तर, " What is God? God is perfection!" ह्या PERFECTION चा ध्यास घेतलेल्या चौघीजणींकडे पाहताना विद्यार्थी जीवनात शिक्षकाचं महत्व काय असतं, हे पटल. मोतिया रंगाला सोनेरी झळाळी आणि त्यावर गर्भरेशमी ओढणी ल्यायलेले पोशाख पाहून त्यांच्या सौंदर्यदृष्टीला दाद द्यावीशी वाटली. ताल-अंगात तीनतालामध्ये कथक परंपरेनुसार उठान, आमदसह विशेष चातुश्र मिश्र तीश्रजाती परण व काही अनवट तुकडे ह्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. भाव-अंगात अष्टनायिका मधली अत्यंत प्रचलित विरहोत्क्न्ठीता नायिका व दक्षयज्ञ कथा सांगणारं लपछड कवित्त पेश केल गेल. ह्या कवित्त मध्ये नृत्य काव्य आणि पढंत ह्याचा सुमधुर संगम अनुभवता आला.
नर्तक श्री. बिरेश्वर गौतम ह्यांनी स्वतः गाऊन 'बैठी ठुमरी' पेश केली. नृत्य आणि गायकीचा दुग्धशर्करा योग, भुवई ने ताल दाखवून केलेले भृकुटीसंचलन आणि हवेत पाय धरून केलेला घुंगरांचा नाद ह्यांनी प्रेक्षक भारावले. पंडिता उमा डोग्रा ह्यांच्या भावूक व अप्रचलित ठुमरीने रसिकांना खिळवून ठेवले. 'अंगावरची वसने काढून तासंतास नदीत विहार करणारी राधा कृष्णाला म्हणते कि मी पाण्यात स्वतःला न्याहाळत बसत नसून त्या श्यामल जळात जणू तुझ्या सावळया कुशीत विसावते असा भास होतो म्हणून मी नदीवर जाते...' असा नवथर, गहिरा विचार नृत्यात प्रस्तुत करणारी ठुमरी पाहिल्यावर अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. कार्यक्रमाचा शेवट शमाताईच्या ठुमरीने झाला.
नृत्यासारख्या अनुभवसंपन्न, अभिजात कलेला जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा वसा आणि आपापल्या गुरूंचा वारसा जबाबदारीने पुढे नेत असलेल्या मातब्बरांच्या कलाविष्कारात सामीलहोऊन रसिक तृप्तमनाने रम्य आठवणी घेऊन परतले.
प्राजक्ता सरवटे-साठे
No comments:
Post a Comment