Pages

Powered By Blogger

Total Pageviews

Monday, February 15, 2016

उमेद




कामगाराची पोटुशी बायको...
डोक्यावर मणमण विटा, राबिट आणि कसलेसे दगड उचलून कामात मग्न होती.
कच्च्या बांधकामावर निसरड्या जमिनीवर ओल्या पायांनी सराईतपणे चालतांना माझ्याचं हृदयात धडधडत होतं. 
रणरणती दुपार, माथ्यावर मी म्हणणारं उन आणि माझ्या पायाला चटके लावणारी तिची अनवाणी चाल...
दुरून कुठूनतरी एका तान्हुल्याचा टाहो.… 
गर्भार कामगारणीची घाई...
घसरलेला उजवा पाय तिचा, काळजाचा चुकलेला ठोका माझा... 
टांगलेल्या झोळीत रडणाऱ्या चिमुरड्याला उराशी घेऊन फुटलेला मायेचा पाझर तिचा...
बाहेर जगणाऱ्याला दुध, आतल्या जीवाला चहा पाव... 
परत कामाला लागलेली माय. 
जणू ती रखरखीत दुपार माझ्याच पावसाची वाट पाहत होती. 
मला रडताना पाहून ती भाबडी ओळखीचं हसली. 
कारुण्यात आनंद शोधणारी ती कि हतबल रडणारी मी....?
माझे फाटके अश्रू त्या झोळीच्या भोकांना ठिगळ लावतीलही. 
कदाचित त्या मातेला आता हा उन्हाळा सहन होईल माझ्या अश्रूंच्या गारव्याने…. 
निवेल तिची रखरख काही क्षण...थंड वाटेल तिला.... 
स्वतः पेक्षा आपल्यावर रडणाऱ्या माझीच तिला दया येईल... 
डोळ्यातल्या पावसानंतर खरोखरच पाउस येईल... 
जमिनीवर पडणारा थंडावा थोडासा खारट होईल... 
ती अजरामर दुपार मला जगण्याची उमेद देईल!

- प्राजक्ता साठे


1 comment:

  1. kharach ga... asha baykana pahila ki bharun yeta.. kautuk vatta tyancha... anu tu evdha touching varnan kela hes tya bai cha dokyat pani ala kharach.

    ReplyDelete